तब्बल २७ वर्षांनी वर्गमित्रांचे स्नेहमिलन – आठवणींना दिला उजाळा, शिक्षकांप्रती व्यक्त केली कृतज्ञता
गंगाखेड (११ मे) – व्यंकटेश विद्यालय, गंगाखेड येथील १९९७-९८ सालच्या दहावीच्या बॅचचे स्नेहमिलन रविवारी (ता.११) मोठ्या उत्साहात पार पडले. तब्बल २७ वर्षांनी पुन्हा एकत्र आलेल्या वर्गमित्र-मैत्रिणींनी जुन्या आठवणींना उजाळा देतानाच आपले गुरुजनांसमोर कृतज्ञतेचा भाव व्यक्त केला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक श्री. व्यंकट कांदे सर यांनी भूषवले, तर प्रमुख पाहुणे म्हणून माधव दहिफळे, भगवान दुर्गे, रमेश सूर्यवंशी, वैजनाथ सानप, गुंडेराव देशपांडे, गणपत काडवदे, श्री. फरकंडकर आदी शिक्षक उपस्थित होते.
दिपप्रज्वलनाने सुरू झालेल्या या कार्यक्रमात स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. सर्व वर्गमित्रांनी आपली वैयक्तिक व व्यावसायिक प्रगती मांडून शाळेच्या आठवणींना उजाळा दिला.
व्यंकट कांदे सरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले, “मोबाईल नव्हता तेव्हा संस्कारक्षम पिढ्या घडल्या. आजची शिक्षणपद्धती बदलली असली तरी मूल्यं जपणं ही आपली जबाबदारी आहे.”
या कार्यक्रमात शिक्षण, वकिली, व्यवसाय, सामाजिक क्षेत्रातील माजी विद्यार्थ्यांनी भाग घेतला. शिक्षक-विद्यार्थी यांच्यातील नात्याचा उल्लेख करत, त्या काळातील शिस्त, छडी व संस्कारयुक्त शिक्षणपद्धतीचं महत्त्व अधोरेखित करण्यात आलं.
मनोगत व्यक्त करणारे प्रमुख सहभागी:
निर्मला शिंदे, मनीष आंधळे, संजय शिंदे, अनंत मुंढे
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सत्कार:
किरण काकानी, आनंद धोका, विनोद महाजन
सूत्रसंचालन: सुप्रिया यानपल्लेवार
आभारप्रदर्शन: डॉ. जयंत बोबडे
स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. तब्बल ४० हून अधिक वर्गमित्रांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली.
–